आमदारांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना आज मंगळवारी (दि. 23) दुपारी घडली.
प्रत्यक्षदर्षींकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. अज्ञातांनी मंगळवारी दुपारी कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकला. मात्र, हा बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला.
सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.