शाळा सुरू करण्याबाबत राज्य स्तरावरच निर्णय… अजित पवार यांचे स्पष्टीकरण
पुणे – करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय. स्थानिक लोकांमध्ये शाळेवरून निर्णय घेताना वाद होतात. त्यामुळे राज्य स्तरावरच याबाबत निर्णय घेणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा अंदाज घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ. काही जणांनी स्थानिक लोकांना यावर निर्णय घेण्यास सांगू असं म्हटलं. पण त्यात पुन्हा वाद होतात. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतचा निर्णय राज्य स्तरावर घेण्यात येईल. त्या-त्या वेळेची परिस्थिती पाहून निर्णय घेतले, परत रद्द केले. काहीजण मग त्यात अगोदर एक आणि नंतर एक निंर्णय घेतात.”
“आज ओमायक्रॉनचे रुग्ण पाहायला मिळत आहे. बूस्टर डोसबाबत काही सूतवाच केलं, पण आधी दोन्ही डोस पूर्ण करून त्यानंतर बुस्टर डोसचा विचार केला जाईल. सिरमकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण बूस्टर डोसचा निर्णय देशाच्या पातळीवर झाला पाहिजे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“कोविडबाबत आढाव घेतला ओमायक्रॉनबद्दल चर्चा सुरू असून आढाव घेण्यात आला. १ कोटी ३८ लाख लसीकरण झाले आहे. पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाले आहे. नवीन ओमायक्रॉनसाठी प्रशासन सज्ज आहे. जे पॉझिटीव्ह रुग्ण आलेले होते त्यातील ७ पैकी ५ निगेटीव्ह आले आहेत. हे सगळे बाहेरच्या देशातून आले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचा प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे. प्रशासन सतर्क आहे. पहिला डोस जिल्ह्यात १०० टक्के झाला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.