पुणे जिल्हा बँकेत संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड

पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील उमेदवार तथा राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद लेंडे यांनी इतर मागास प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे जिल्हा बँकेची उमेदवारी संभाजी होळकर यांना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही बिनविरोध निवड झाली असून त्या पाठोपाठ संभाजी होळकर ही जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

संभाजी होळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या बारामती तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम व आरोग्य सभापती, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आणि होळ या गावाचे सरपंच म्हणून काम केले आहे.

Share to