भाजपाच्या दोन आमदारांची शहरात हुकूमशाही, महापालिकेची लुटून खाल्ली तिजोरी
- नगरसेवक तुषार कामठे यांचा सणसणीत टोला
- पत्रकार परिषदेत राजीनाम्याचा केला खुलासा
पिंपरी (प्रतिनिधी) – पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिक्युअर आयटी सोलुशन कंपनीचा जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला, शहरातील अनधिकृत फ्लेक्स, मनपामध्ये जुन्या ठेकेदारांचे भाजपच्या पदाधिका-यांबरोबर संगनमत या विरोधात मी वेळोवेळी महानगरपालिकेच्या सभागृहात आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. याबाबत पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती. मला वेळोवेळी डावलण्याचे त्यांचे धोरण होते. दोन्ही आमदारांच्या हुकूमशाही धोरणाच्या निषेधार्थ मी गुरुवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला, अशा शब्दांत नगरसेवक तुषार कामठे यांनी भाजपा नेत्यांवर रोष व्यक्त केला.
शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुषार कामठे यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि मनपातील भ्रष्टाचारी अधिका-यांवर टिका केली. यावेळी ते म्हणाले की, महापालिकेच्या तिजोरीची लुट करण्याचे स्थानिक भाजपा आमदार (महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता) आणि पदाधिका-यांचे धोरण आहे. पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न हाती घेऊन मी आवाज उठवला आंदोलन केले, उपोषणही केले. कचऱ्याच्या समस्यासाठीचे आंदोलन असेल, दारूचे दुकान बंद करण्यासाठीचे आंदोलन, अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात आंदोलनात करताना माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम केले. नागरिकांचे प्रश्न सोडविताना भाजपाचे शहरातील नेते, पदाधिकारी किंवा आमदार यांचे कधीच सहकार्य लाभले नाही. उलट माझी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूकच करण्यात आली.
नुकताच जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सिक्युअर आयटी सोलुशन या ठेकेदाराबद्दल मी पुराव्यांसाहित आवाज उठवला. पण शहरातील भाजप नेत्यांनी या विषयातही मला सहकार्य केले नाही. नाईलाजाने ह्या भ्रष्टाचाराबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या विषयात कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर नेत्यांनी पोसलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला. दोन्ही आमदारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी अक्षऱषः लुटून खालली आहे. त्यांच्या हुकूमशाही कारभारावर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातूनच आपण राजीनामा दिल्याचे कामठे यांनी सांगितले.