स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी महापालिकेची रविवारी सायक्लोथॉन रॅली
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड हे शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी होण्यासाठी पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने रविवारी (दि. 27) सकाळी सहा वाजता सायक्लोथॉन रॅली 2022 काढण्यात येणार आहे.
ही रॅली नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस मार्गावरील कल्पतरु सोसायटी, नाशिक फाटा पुलाजवळ, पिंपळे गुरव पासून वाकड मुंबई-बेंगलोर पश्चिम बाह्य वळणावरील पुलाखालून पुन्हा त्याच मार्गाने कल्पतरू सोसायटी नाशिक फाटा पुलाजवळ पिंपळे गुरव या मार्गे काढण्यात येणार आहे.
रॅलीचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते होणार आहे. याअनुषंगाने कल्पतरु सोसायटी, नाशिक फाटा पुलाजवळ पिंपळे गुरव येथे पुणे जिल्हा योगा अँण्ड फिटनेस इन्स्टिट्युट, ज्ञान प्रबोधिनी निगडी यांच्या वतीने योगाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स फाऊंडेशन बॉक्सींग क्लब पिंपरीनगर यांच्या वतीने बॉक्सींग खेळाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया यांच्या वतीने कराटे खेळाची प्रात्यक्षिके व परिषित चव्हाण यांच्यामार्फत झुंबा डान्स सादर केला जाणार आहे.