मला मारण्याची सुपारी दिली पण मी सुदैवाने वाचलो… म्हणत नारायण राणे यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या मुलाखतीनंतर भाजप नेते प्रतिक्रिया देत ठाकरे यांच्यावर पलटवार करत आहेत.

दरम्यान, भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिल्लीत प्रेस काॅन्फरन्स घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट आणि केविलवाणी व्यथा आहे. मुख्यमंत्री पद गेल्याने उद्धव ठाकरेंची ही अवस्था झालीय. मी या व्यक्तीला 40 वर्ष ओळखतो, अंगात खोटेपणा, कपटीपणा, द्वेश आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. राणे म्हणाले, मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितले. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. माझी पण सुपारी दिली पण मी सुदैवाने वाचलो, असे राणे म्हणाले.

हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा. माझ्या वडिलांचा फोटो का वापरता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले, वारसा रक्ताने नव्हे तर विचाराने मिळतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचे ऐकले नाही पण बाळासाहेब ठाकरेंचे ऐकले. यांसह अनेक मुद्यांवरून राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

Share to