मंत्रिमंडळातील सर्व चेहरे भ्रष्टाचारी व माथी अनियमित कामांचा शिक्का असणारे – राष्ट्रवादी
मुंबई – अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आज 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा हे आमदार शपथबद्ध झाले. दरम्यान या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
आज महाराष्ट्रात बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मागील 40 दिवसांपासून विरोधकांनी आणि जनतेनी आवाज उठवला आणि यातून राज्यातील जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला.
या मंत्रिमंडळात सर्व चेहरे हे भ्रष्टाचार, आणि अनियमित कामांसाठी ओळखले गेलेले चेहरे आहेत. अब्दुल सत्तार हे टीईटी घोटाळ्यातील आरोपी आहेत तर संजय राठोड हे एका मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत. बोगस पदव्या, वादग्रस्त वक्तव्य, अधिकाऱ्यांना दमदाटी, महाराष्ट्र विकत घेण्याची भाषा करणारे तानाजी सावंत असे लोक मंत्रिमंडळात आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या घडवलेल्या सुसंकृत राजकारणाला बट्टा लावून महाराष्ट्राची देशात बदनामी या शिंदे गट-फडणवीस सरकारकडून झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारच्या अन्यायी कारभाराला ताकदीने विरोध करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले आहे.