हलगीचा कडकडाट अन ट्रंपेटचा आवाज हरपला….
– ऐतवडे बुद्रुक मधील कलाकारांच्या निधनानंतर व्यक्त होतेय हळहळ
– तात्या, बापू आणि डीएसके यांच्या आठवणींना मिळतोय उजाळा
सांगली ! प्रदीप लोखंडे
‘पर्बत के उस पार, पर्बत के इस पार’ हे ‘सरगम’ चित्रपटातील गाणं असो अथवा ‘एक दुजे के लिये’ मधील ‘सोला बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं असो. किंवा ‘प्यासा सावन’ मधील ‘मेघा रे मेघा रे…मत परदेस जा रे’ हे गाणं असो. यासह जुन्या चित्रपटातील अनेक गाणी हुबेहूब ऐकावी वाटतील, असे वादन ऐतवडे बुद्रुक मधील बँड’च्या माध्यमातून कलाकारांनी केले. हा बँड एखाद्या गावात वाजविण्यासाठी असला की पंचक्रोशीतील नागरिक ऐकण्यासाठी दाखल व्हायची. बँड जितका प्रसिद्ध आहे. तितकीच प्रसिध्दी कलाकारांना मिळाली.
डीजे आणि रॉक स्टाईल गाण्याच्या जमान्यात ऐतवडे बुद्रुक परिसरातील याच बँडच्या आठवणींना आणि त्यामधील कलाकारांना आज उजाळा मिळत आहे. त्याला निमित्त ठरले याच बँड मधील रमेश कांबळे, रघुनाथ कांबळे आणि धोंडीराम कांबळे यांच्या निधनाचे. रमेश कांबळे हे बापू या नावाने, रघुनाथ कांबळे हे तात्या नावाने तर धोंडीराम कांबळे हे डीएसके अंकल या नावाने सर्वत्र परिचित होते. १० दिवसापूर्वी रमेश बापू यांच्या निधनाचे वृत्त ताजे होते. तोपर्यंत रघुनाथ तात्या यांचे निधन झाले अन् सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. दोन वर्षापूर्वी डीएसके अंकल यांनी देखील जगाचा निरोप घेतला.
रमेश कांबळे (बापू)…..

ऐतवडे बुद्रुक मधील बँडच्या निर्मितीत बापुंचा मोठा वाटा आहे. बँड प्रती त्यांच्या मनात मोठा आदर होता. नव्या तरुणाईने बँड विषयी चुकीची वक्तव्य अथवा अनादर केल्यास त्यांना बापूंचे खडेबोल एकावे लागत. ट्रंपेट नावाचे वाद्य बापू वाजवीत होते. गाणी वाजविण्याचा सराव करताना आपल्या वाद्यासह इतरांची वाद्ये वाजवून देखील ताल, सुर काय आणि कसा असावा याबाबत बापू मार्गदर्शन करायचे. नव्या पिढीने बँजो ऐवजी बँड वाजवायला शिकले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. ते न झाल्यास त्यांचा दम देखील असायचा. राजकारणाचा विषय असला तरी आपल्या नेत्यांविषयी बापूंची विशेष निष्ठा जाहीररित्या दिसत असे. कालांतराने उतार वयात काही आजारांनी बापूंना घेरले. मात्र तरीही हातात ट्रंपेट घेऊन त्यात बापू बेधुंद रमून जात होते. आजाराला विसरून एक जीवाने ते आपले वाद्य वाजवीत होते. त्यांच्या कलाकारी बद्दल अनेक जन कौतुक करायचे. मात्र आजाराचा विळखा वाढला आणि बापू यांचे ११ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले.
———————-
रघुनाथ कांबळे (तात्या)….

तात्यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी २२ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. हातात हलगी हे वाद्य आल्यावर एखाद्या तरुणाला लाजवेल, असा उत्साह तात्यांचा होता. गावात कोणतेही शुभ कार्य असो. तात्यांच्या हलगीचा कडकडाट सर्वांना ऐकायला मिळायचा. मंत्रमुग्ध करायचा. तात्या अंत्यत प्रेमळ आणि भोळ्या स्वभावाचा माणूस. सकाळी सर्व कामे उरकून घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या परिसरात अस्वछता दिसली की तात्यांच्या हातात झाडू दिसणारच. घर आणि परिसर कोणाचाही असो तात्या स्वच्छ करणारच, असा त्यांचा स्वभाव. समोर व्यक्ती आल्यास आपुलकीने, प्रेमाने स्वतःहून बोलावून चौकशी करायचे. कितीही वय झाले असली तरी आपल्या पेक्षा लहान असणाऱ्यांना देखील आदराने बोलवायचे असा त्यांचा अप्रत्यक्ष नियम. बँड मध्ये तात्या थाप ढोल हे वाद्य वाजवायचे. एखाद्या गाण्याचा सुर कानावर आला तरी तात्यांचा हात हातावर पडून त्याचे वादन कसे आहे, हे शास्त्रीय दृष्ट्या सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. रामायण ही भजनी स्वरूपातील कलाकृती सादर केली जात होती. या मध्ये तात्या हरीण हे पात्र उत्कृष्ट करायचे. आपल्या स्वभावाने तात्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
——————-
धोंडीराम कांबळे (डीएसके अंकल)….

डीएसके अंकल म्हणून सर्व जण आदराने बोलवत होते. कितीही दुःख असले तरी डीएसके अंकल यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच कमी झाले नाही. बोलण्यात अडखळपणा असला तरी डीएसके अंकल यांचे विनोद करण्याचे टायमिंग अप्रतिम असायचे. या पेक्षाही बँड मध्ये ते ईपोनियम हे वाद्य ते उत्कृष्ठरित्या वाजवायचे. आपल्या मित्रांमध्ये सर्वात आवडते व्यक्तीमत्व त्यांचे होते. त्यांच्यासोबत विनोदाच्या गप्पा रंगत होत्या. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना पहाडासारखी झुंज त्यांनी दिली. या संकटांची उघड वाच्यता न करता ते त्यावर मात करताना दिसले. सर्वांशी आपुलकीने हसून संवाद करणारे ते होते. कालांतराने उतारवयात अनेक आजारांचा त्यांना त्रास सहन करावा लागला. या आजारपणातही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आवाज देऊन विचारपूस करायचे. दोन वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. मात्र आपल्या सहकारी मित्रांसोबतचा त्यांचा हसरा फोटो समोर आला अन् डीएसके अंकल यांच्याही आठवणींनी अनेक जन गहिवरून गेले.
———-
तात्या, बापू आणि डीएसके अंकल यांनी कलेलाच आपले आयुष्य मानले होते. जो पर्यंत कला जिवंत होती तो पर्यंत ही प्रेमळ स्वभावाची माणसे खुल्या दिलाने..आनंदात दुःख विसरून जगत होती. बदलत्या जमान्यात कलेचा लोप झाला. कला थांबली. तसे या माणसांचा श्वासही थांबला. आज ही माणसे जग सोडून गेली असली तरी कलेचा विषय आला की या माणसांच्या आठवणींना उजाळा मिळणार हे मात्र नक्की. हे तिघेही आज जग सोडून गेले असले तरी त्यांचे मन मात्र हेच म्हणत असेल…
‘जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ,
जी चाहे जब हमको आवाज़ दो…
हम हैं वहीँ ! हम थे जहां !
———————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967