मनसेचे लोकसभा लक्ष्य, वसंत मोरे यांच्यावर बारामती मतदार संघाची जबाबदारी
पुणे – केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे मनसे आता स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागा, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा मतदार संघासाठी नियुक्ती केलेल्या निरीक्षकांना दिल्या. वसंत मोरे यांच्यावर बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती मतदार संघात मनसेची ताकद वाढविण्यासाठी मोरे यांना कसरत करावी लागणार आहे.
त्याच अनुशंगाने मनसेनं पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची निवड केली आहे. मनसेचे हे मिशन लोकसभा असले तरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यावरच लक्ष असल्याचे या निवडीवरुन दिसून येत आहे. याच जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभेच्या मतदार संघात ह्या पक्ष निरीक्षकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवाय पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुका मनसे लढणार असे संकेत दिले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील तिन्हही लोकसभा मतदार संघात मनसेने पक्ष निरीक्षकांची निवड केली आहे. या मतदार संघाचा अभ्यास आणि अचूक निरीक्षणाची जबाबदारी ही या पक्ष निरीक्षकावर असणार आहे. यामध्ये मावळ मतदारसंघासाठी किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते हे असणार आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघासाठी अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बारामतीची जबाबदारी ही वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांच्यावर राहणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीच या निवडी केल्या आहेत.
केवळ लोकसभाच नाहीतर मनसे हा यंदा स्थानिक स्वराज्य संस्थावरही लक्ष केंद्रीत करणार आहे. याची सुरवात पुणे जिल्ह्यातून करण्यात आलेली असली तरी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकावर जोर वाढणार आहे. आतापर्यंत विशिष्ट शहारांपुरता मर्यादित असलेला पक्ष हा स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्येही सहभागी होणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगपरिषदेच्या निवडणुका लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाहीतर सध्या राज्याच्या राजकारणात अस्थिर परस्थिती निर्माण झाली आहे. याकडे संधी म्हणून पहा आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर द्या असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. शिवाय आगामी काळात सबंध महाराष्ट्रभर दौरेही असणार असेही ते म्हणाले आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघणार तर आहेच पण राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.