लाचखोरीला खतपाणी घालणारे खरे चोर आजही फिरतायत खुलेआम !

  • ‘सापडला तो चोर नाही तर शिरजोर’ याप्रमाणे भ्रष्ट यंत्रणा कार्यरत
  • शंड विरोधकांमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह चौघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यात लांडगे अथवा इतर कर्मचा-यांचा कसलाच दोष नाही, कारण त्यांना लाच घेण्यासाठी बळी पाडणा-या ख-या सुत्रधारांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. कायद्यानुसार लाच स्वीकारणारे दोषी असले तरी त्यांना हे कृत्य करायला भाग पाडणारा त्याहून अधिक मोठा गुन्हेगार ठरतो. हे बडे गुन्हेगार आजही खुलेआम समाजामध्ये वावरताना दिसतात. ‘एसीबी’च्या कारवाईचा यांच्यावर कसलाच परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सत्तेत ‘सापडला तो चोर नाही तर शिरजोर’ असा भाजप पदाधिका-यांचा कारभार सुरू आहे.  

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सलग पंधरा वर्षे सत्ता भोगली. त्यांच्या कार्यकाळात कधी पालिकेवर एसीबीला कारवाई करावी लागली नाही. कारण, सर्व कारभार सुरळीत चालत होता असे नाही, तर सर्वांना समान वाटा मिळायचा म्हणून त्यावेळी कोणी एसीबीकडे तक्रार केली नसावी. त्यावेळीही विरोधक होतेच, त्यांना सुध्दा संतुष्ट ठेवण्याचे काम तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने केले. तरीही, 2017 दरम्यान यातील संतुष्ट व असंतुष्टांच्या जास्तीचे पैसे कमावण्याच्या लालसी वृत्तीने 27 लाखांच्या कथीत विठ्ठल मुर्ती घोटाळ्याचा राणभर डिंडोरा पीटून अजित पवारांना आव्हान दिले. अजित पवारांच्या नियंत्रणात चालणारी सत्ता भाजपच्या चारदोन भ्रष्ट शिलेदारांच्या हाती गेली. सत्ता आल्यानंतर भाजपातील जुणेजाणते देखील या शिलेदारांच्या वळचणीला आले. बघता बघता संपूर्ण पालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटत गेला. पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळाल्याने पदाधिका-यांनी गेल्या साडेचार वर्षात पालिकेला अक्षरषः ओरबाडून खाण्यापलीकडे दुसरे काहीही केले नाही. जर खरच पारदर्शक कारभार केला असता तर शहरामध्ये नाविन्यपूर्ण एकतरी प्रकल्प दिसला असता. छाती ठोकपणे सांगता येईल असा एकही प्रकल्प गेल्या साडेचार वर्षात भाजपला करता आलेला नाही. प्रत्येक कामाच्या निविदेत रिंग करणे, मर्जीतील ठेकेदाराला काम देणे, भागीदारीत काम करणे, नातेवाईक ठेकेदाराला काम देणे, त्यातून जास्तीचे पैसे मिळवणे यावर पदाधिका-यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे भाजपच्या कथीत पारदर्शी प्रतिमेला भ्रष्टाचाराचा धब्बा लागत गेला.

परंतू, स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या ‘ब्लड रिलेशन’ मधील एकाही नातेवाईकाला (भावकी सोडून) काम मिळवून दिलेले नाही. त्यातून जास्तीचे पैसे मिळवण्याची अपेक्षा ठेवली नाही. मात्र, सभापती पदावर बसल्यानंतर त्यांना हे करण्यास भाग पाडले गेले. त्यांच्या मनमिळाऊ वृत्ती, मृदू आणि साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांना दुष्कृत्य करण्यास भरीस घातले. त्यामुळे ते एसीबीच्या कारवाईची शिकार बनले. त्यांना हे करण्यास भाग पाडणारे नामानिराळे राहिले. ते खरे चोर असून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. वास्तविक पाहता या कारवाईत अडकलेल्या तीन कर्मचा-यांनी देखील गेल्या साडेचार वर्षात स्थायीच्या प्रत्येक सदस्याचा वाटा त्याच्या घरापर्यंत कसा पोहच होईल, याची चोख व्यवस्था करण्याचे काम केले आहे. त्यामुळे एसीबीच्या कारवाईत ते अडकले असले तरी त्यात एवढे नवल वाटण्यासारखे काहीही नाही. कारण, त्यांना लाच घेण्याची सवय भाजपच्याच पदाधिका-यांनी लावली. हे खरे सुत्रधार आजही समाजामध्ये उथळ माथ्याने खुलेआम फिरताना दिसतात. जोपर्यंत हे शहराच्या राजकारणात सक्रिय राहतील, तोपर्यंत त्यांच्याकडून नागरिकांच्या टॅक्सरुपी करोडो रुपयांची अशी लूटच होत राहणार, असा निष्कर्ष राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

पार्थप्रेमी भ्रष्ट पदाधिका-यांमुळे राष्ट्रावादीची प्रतिमा मलीन

भाजपच्या पदाधिका-यांनी साडेचार वर्षाच्या कार्यकाळात एक गोष्ट चातुर्याने केलेली आहे. स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्यांनी या पापात राष्ट्रवादीला वाटेकरी केले आहे. प्रत्येक निविदा प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या भ्रष्ट पदाधिका-यांना भागिदार करवून घेतले आहे. माजी महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायीचे माजी सभापती असे अनेक पदाधिकारी तसेच दोन ते तीन टर्म निवडून आलेले नगरसेवक पैशासाठी इमान गहान ठेवून भाजपाच्या भ्रष्टाचारात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीतील अनेकांकडे रस्तेसफाई, सुरक्षारक्षक पुरवणे, जलपर्णी काढणे, पाणी वितरण व्यवस्था, ऑक्सिजन पुरवठा, कोविड केअर सेंटर संचलन, अशी कोट्यवधी रुपये खर्चाची कामे आहेत. यातून करोडो रुपयांचा मलिदा लाटला जातो. त्यामुळे राष्ट्रावादीच्या पदाधिका-यांना भाजपतील भ्रष्टाचा-यांकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळेच की काय, लाचखोरीच्या प्रकरणाला त्यांच्याकडून प्रखर विरोध होताना दिसत नाही. माजी आमदार विलास लांडे यांच्यामध्ये चोराला चोर म्हणण्याची धमक आहे. परंतू, त्यांच्यातील राजकीय चातुर्याची पारख नसल्यामुळे त्यांना पक्षाकडून ताकद दिली जात नाही. त्यामुळे आणि पार्थप्रेमी भ्रष्ट पदाधिका-यांवर नेत्यांचा अतिविश्वास असल्यामुळे बालेकिल्यातच विरोधी पक्ष असताना राष्ट्रावादीचे पतन होताना दिसत आहे.

Share to