शिराळ्यातील आजी माजी आमदार नाईक म्हणतात आम्ही पक्ष आणि पवार साहेबांसोबत
- राज्यात राजकीय घडामोडी बदलत असताना शिराळ्यात नेते नियोजित कार्यक्रमात व्यस्त
महाईन्यूज : प्रदीप लोखंडे
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार सध्या 40 आमदार घेऊन भाजपा सोबत जातील अशा राजकीय चर्चा रंगत आहेत. राज्यभरातील अनेक आमदार सध्या मुंबईत दाखल झाल्याचे देखील समजते. मात्र शिराळा विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदार नाईक मात्र तालुक्यातच आपले नियोजित दौरे पूर्ण करत आहेत. तसेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो निर्णय घेईल त्यांच्यासोबत असल्याचे मत ते व्यक्त करत आहेत.
राज्यात राजकीय भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार 40 आमदारांसह भाजपासोबत सत्तेत सहभागी होतील असे चित्र आहे. यासाठी राज्यातील आपल्या समर्थक आमदारांना त्यांनी मुंबईत बोलावल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शिराळा विधानसभा मतदारसंघातील आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न महाईन्यूजच्या माध्यमातून केला. हे दोघेही मतदारसंघात असून ते आपले दौरे करत पूर्ण करत असल्याचे स्पष्ट झाले. राज्यात काहीही घडामोडी झाल्या तरी राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचे या दोघांकडून स्पष्ट करण्यात आले.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, अजित दादां बाबत अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला कोणाचाही फोन आलेला नाही. बैठकीला बोलावल्याचा निरोप नाही. ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या तथ्यहीन आहेत.
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील नेते आहेत. हे दोघे आणि पक्ष जो निर्णय घेईल त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्याबरोबरच शिवसेनेचे 16 आमदार पात्र होतात की अपात्र या निकालाकडे राज्य भरातील सर्व लोकांचे लक्ष आहे. त्यानंतर राजकीय चित्र वेगळे असेल. सध्या तरी आम्ही पक्षाच्या सोबत आहोत.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
- मो. नं – 7350266967