कोल्हापुरात कंडका पडला, पण महाडिकांचा नाही तर सतेज पाटलांचा
- छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीत महाडिक पॅनेलची एकहाती सत्ता
महाईन्यूज : प्रदीप लोखंडे
कोल्हापूरचा विषयच हार्ड असतो. इथले शब्द, इथली संस्कृती, पर्यटन स्थळे, राजकारण करणारी मंडळी आदींचा राज्यात न्हवे तर देशात देखील बोलबाला असतो. कोल्हापूरचा तांबडा पांढरा झणझणीत रस्सा तर सगळ्यांच्याच आवडता विषय. या झणझणीत रश्याप्रमाणेच इथले राजकारणही तेवढेच तिखट आणि चवीचा विषय ठरतो. सध्या कोल्हापुरात ‘कंडका पाडायचा’ हा शब्द प्रचार सगळीकडे गाजत आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी महाडिक पॅनेलच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांनी हा शब्दप्रयोग वापरला होता. पाटील यांनी प्रचाराचे रान उठवले. निवडणूक झाली. निकालही हाती आला. निकालानुसार कंडका पडला खरा. पण तो महाडिकांचा न्हवे तर आमदार सतेज पाटील यांच्या पॅनेलचा. माजी आमदार महादेवराव उर्फ आप्पा महाडिक यांच्या मार्गदर्शनाने व माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाडिकांचे पॅनेल सर्वच्या सर्व २१ जागांवर विजयी झाले. या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो खासदार धनंजय महाडिक यांनी.
कोल्हापूरच्या राजकारणावर सध्या माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज (बंटी) पाटील, माजी आमदार महादेवराव (आप्पा) महाडिक आणि खासदार धनंजय (मुन्ना) महाडिक यांचा विशेष प्रभाव आहे. या मधील खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचा टोकाचा संघर्ष राज्याला माहिती झाला आहे. दोघांकडून एकमेकांविरोधात प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. आमदार सतेज पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत महाडिकांविरोधात ‘आमचं ठरलंय’ हा शब्दप्रयोग राज्यात चर्चेत आणला होता. सध्या ‘कंडका पाडायचा’ हा शब्द प्रयोग राबवला आहे. निमित्त होते छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे. कंडका हा शब्द ऊस या पिकाशी संबधीत आहे. ऊसाचा कंडका असा शब्द प्रयोग केला जातो. आता कंडका पाडायचा म्हणजे एखादा विषय जिथल्या तिथं संपवायचा, अशा अर्थाने ग्रामीण भागात वापरला जातो. आता ऊस कारखान्याची निवडणूक लागताच त्याच्याशी संबंधित शब्द प्रयोग घेऊन चर्चेत येण्याचे काम आमदार सतेज पाटील यांनी केले खरे. मात्र महाडिक देखील त्याला पुरून उरल्याचे दिसले.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आहे. आप्पा महाडिक यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या राजकीय शैलीवर कोल्हापुरातील जनता, विशेषतः तरुणाई फिदा आहे. अडलेल्या नडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याचा महाडिक पॅटर्न त्यांनी राबवला आहे. गरजूला आर्थिक मदत करण्यात महाडिकांचा हात सढळ आणि मोकळा आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व अबाधित आहे. आप्पा महाडिकांच्या याच दिलदार स्वभावामुळे ते १८ वर्ष विधानपरिषदेवर आमदार होते. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँकेवर त्यांचे अनेक वर्ष वर्चस्व होते. आमदार सतेज पाटील यांनी या वर्चस्वाला आव्हान देत त्यांच्या हातून सत्ता काढून घेतली. आता कारखाना निवडणुकीत चॅलेंज देत ते मैदानात उतरले होते. आमदार सतेज पाटील यांनी कितीही बाजी पनाला लावली असली तरी सभासदांनी मात्र माजी आमदार आप्पा महाडिक यांनाच भरघोस पाठिंबा देऊन विश्वास दाखवला. यावरून महाडिकांचा प्रभाव अद्यापही कायम दिसला. या विजयाच्या जोडीला खासदार धनंजय महाडिक यांची साथ मिळाली. राज्यसभेच्या निवडणुकीत खा. महाडिकांचा विजय हा महाडिक गटाला ऊर्जा देणारा ठरला. त्याचे सकारात्मक परिणाम कारखाना निवडणुकीतही दिसले.
एकंदरीत आमदार सतेज पाटील यांनी कंडका पाडायचा केलेला निर्धार अपयशी ठरल्याचे दिसले. सतेज पाटील यांच्या कंडका पाडायच्या आव्हानाला उत्तर देताना आप्पा महाडिक म्हणाले होतेच. असले आव्हान मुन्ना म्हणजेच खासदार धनंजय महाडिक यांच्या लेव्हलला ठीक आहे. माझ्या लायकीला नुसतं धर की, वड की, पकड की, चितपट कर असं असतंय हो. आप्पा महाडिक यांनी हे सिद्ध करत कोल्हापूरच्या राजकारणातला बाहुबली अद्याप आपणच असल्याचे सिद्ध केले आहे.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज.
- मो. नं – ७३५०२६६९६७