वादग्रस्त पवना जलवाहिनीला मावळमधून विरोध, पिंपरी-चिंचवडचं नाव बदनाम करण्याचा भाजपचा डाव
- तालुक्यातून पिं. चिं. शहराविषयी वापरली जातेय निर्वाणीची भाषा..
- माकडाप्रमाणे मजा पाहण्याचा उद्योग सोडा – संतोष सौंदणकर…
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजपप्रणीत महायुती सरकारने कोणालाही विश्वासात न घेता नुकतीच पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठविली. त्यामुळे मावळ तालुक्यात असंतोषाचे वातावरण पेटले आहे. या दिशाहीन निर्णयामुळे मावळ तालुक्यातून शहराविषयी निर्वाणीची भाषा वापरत आंदोलन केले जात आहे. पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदनाम होत असून ग्रामीण आणि शहरी वादाला आयतीच फोडणी मिळाली आहे. हे कटकारस्थान रचण्याचं महापाप सत्ताधारी भाजपकडून होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांप्रमाणे अवस्था करून माकडाप्रमाणे मजा पाहत बसण्याचा नवीन उद्योग सध्या भाजपकडून सुरु आहे. तो उद्योग भाजपने थांबवावा आणि पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय समन्यायी पद्धतीने सोडवावा. अन्यथा जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही. त्याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच उमटतील; त्यासाठी सावध व्हा, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बारा वर्षांपूर्वी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला मावळातील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. त्यासाठी मोठे जन आंदोलन उभारले होते. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते तर, अनेकजण जखमी झाले होते. या घटनेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती तब्बल बारा वर्षांनी पुन्हा महायुती सरकारने उठवली आहे. मजेशीर बाब म्हणजे मावळ तालुक्यातील ज्या भाजपचा या योजनेला तीव्र विरोध होता; आज त्याच भाजपने राज्याचे मुख्यमंत्री अनं उपमुख्यमंत्री यांच्या खांद्याचा वापर करून पुन्हा ही योजना कार्यान्वित करण्यासाठी योजनेवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा मावळातील शेतकऱ्यांसमोर उघडा पडला आहे.
मावळात सध्या प्रकल्प रद्द करण्यासाठी उग्र आंदोलन केलं जात आहे. विशेष म्हणजे ज्या नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे; तेच नेते व त्यांचेच पक्ष सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याच नेतेमंडळींनी पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवली आहे. आता तीच मंडळी आंदोलन करत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे आहेत. माजी आमदार व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत तर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत, असे असताना देखील मावळातील जनतेला आंदोलन करण्याची आणि पिंपरी चिंचवड शहराला दूषनं द्यायची वेळ का येते? याची उत्तरे मिळाली पाहिजेत, असा सवाल सौंदणकर यांनी उपस्थित केला आहे.
या मुद्द्याचं राजकारण न करता भाजपने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना विश्वासात घेऊनच ही योजना कार्यान्वित करावी. शहर वासियांचाही पाण्याचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी समन्यायी तत्वाचा वापर करून हा तिढा सुटावा यासाठी प्रयत्न करावेत; आगीत तेल ओतण्याचं काम थांबवावं. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातूनदेखील पक्षाला हद्दपार होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असे या पत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे.