करंजवडे ते डोंगरवाडी निकृष्ठ रस्ता ; मुख्यमंत्री कार्यालयाकडे होणार तक्रार
– ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची करणार मागणी
सांगली : प्रदीप लोखंडे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेल्या करंजवडे ते डोंगरवाडी दरम्यान रस्त्याच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. गावचे माजी सरपंच प्रतिनिधी दिलीप शेखर यांनी ही माहिती दिली आहे. या वेळी ते ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार आहेत. तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत.
या बाबत माजी सरपंच प्रतिनिधी दिलीप शेखर हे मुख्यमंत्री कार्यालयाकडे या बाबत लेखी तक्रार करणार आहेत. रस्ता बनविताना माती टाकून त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. हे निदर्शनास आणून देणार असल्याचे शेखर म्हणाले. जनतेच्या पैशातून असणाऱ्या निधीतून दर्जेदार काम न झाल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे शेखर म्हणाले. तसेच संबधित विभागाचे अधिकारी या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत आहेत. पाहणी करायला येत नाहीत. त्यांची देखील तक्रार करून कारवाईची मागणी केली जाणार आहे.
करंजवडे ते डोंगरवाडी दरम्यान रस्त्याच्या कामात दर्जा ठेवण्यात आलेला नाही. या दोन गावांना जोडणाऱ्या 1 हजार 660 मीटर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 91 लाख रुपयांचा निधी पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसह या साठी उपलब्ध करून दिला आहे. हे काम करताना दर्जेदार मुरूम, डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र या कामात मातीचे प्रमाण अधिक वापरले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याच्या कडेला मोठा थर याचा रचला आहे. परिणामी सातत्याने वाहने ये जा करू लागल्यास रस्त्याचा काठ खचून पुन्हा रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी ठेकेदाराला योग्य समज देऊन चांगल्या दर्जाचा रस्ता बनविण्याबाबत सूचना देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967