करंजवडे ते डोंगरवाडी दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ठ
– मातीमिश्रीत अधिक भर ; रस्ता खचण्याची शक्यता
सांगली : प्रदीप लोखंडे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेल्या करंजवडे ते डोंगरवाडी दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ठ पणाने सुरू आहे. अधिकारी या कामाकडे कानाडोळा करत असल्याने सबंधित ठेकेदाराकडून मातीचे प्रमाण अधिक वापरले आहे. परिणामी पावसाळयात अथवा वाहने ये जा झाल्यास पुन्हा हा रस्ता खचेल अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. निकृष्ठ काम करणाऱ्या संबधित अधिकारी आणि ठेकेदारावर वचक कोण ठेवणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागात अंतर्गत रस्ते दर्जेदार होणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाही. शासकीय पातळीवर योजना मंजूर होते. ठेकेदाराला काम मिळते. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने निकृष्ट पणाने काम उरकून आपले खिसे भरण्याचे काम संबधित ठेकेदार करत असतो.
करंजवडे ते डोंगरवाडी दरम्यान रस्त्याच्या कामात हीच परिस्थिती दिसत आहे. या दोन गावांना जोडणाऱ्या या 1 हजार 660 मीटर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 91 लाख रुपयांचा निधी पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसह या साठी उपलब्ध करून दिला आहे. हे काम करताना दर्जेदार मुरूम, डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र या कामात मातीचे प्रमाण अधिक वापरले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याच्या कडेला मोठा थर याचा रचला आहे. परिणामी सातत्याने वाहने ये जा करू लागल्यास रस्त्याचा काठ खचून पुन्हा रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी ठेकेदाराला योग्य समज देऊन चांगल्या दर्जाचा रस्ता बनविण्याच्या सूचना देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
या बाबत माजी सरपंच प्रतिनिधी दिलीप शेखर यांनी सांगितले की, करंजवडे ते डोंगरवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य नाही. मातीचे प्रमाण जास्त आहे. वास्तविक पाहता रस्त्याचे काम करताना खडी अधिक वापरणे आवश्यक आहे. तरच दर्जेदार रस्ता तयार होईल. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता एस. एस. सुतार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, लाल मुरूम वापरण्याला परवानगी आहे. रस्ता तयार करताना तिथे खोदून मिळालेलं रस्त्याच्या काठासाठी वापरू शकतो. तरी देखील रस्त्याची पाहणी करतो. मातीचे प्रमाण अधिक असेल तर ते ठेकेदाराला काढून घ्यायला सूचना देतो.
————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967