पलूस कडेगावचा वाघ इस्लामपूरच्या वाघावर पडला भारी !
संपादकीय
सांगली : सांगलीच्या राजकारणात वाघांची संख्या वाढताना दिसत आहे. प्रत्येक जण तशाच घोषणा सभेत करताना दिसत आहे. मात्र त्या वाघांमध्ये सगळ्यात ताकदवर वाघ कोण, असा प्रश्न मात्र जनतेला पडला होता. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले. आणि सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना निवडून आणणारा पलूस कडेगावचा वाघ ताकदवान ठरल्याची चर्चा सुरू झाली. या वाघाने इस्लामपूरच्या वाघावर राजकीय मात केल्याची देखील चर्चा रंगत आहे. ही चर्चा का रंगतेय त्याला देखील निमित्त आहे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. निकाल हाती आले आहेत. सांगलीच्या लोकसभेवर अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले. यापूर्वी सांगलीच्या जागेचा विषय राज्यासह देशभरात गाजला. काँग्रेसच्या हक्काच्या बालेकिल्ल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट उमेदवार जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली. आमदार विश्वजीत कदम यांनी प्रयत्न करूनही ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. तर शिवसेनेची ताकद नसतानाही चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरविण्यात आले. या सर्व खेळांमध्ये इस्लामपूरच्या वाघाची चाणक्य बुद्धी होती, अशा चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये रंगल्या होत्या. त्याबाबत इस्लामपूरच्या वाघाने आपली बाजू मांडली देखील आहे. मात्र खरी वस्तुस्थिती सांगलीच्या जनतेलाच माहित आहे.
जागा न मिळाल्याचे शल्य मनात असल्याने पलूस कडेगावचा वाघ दुखावला होता. त्यामुळे दुखावलेला वाघ आक्रमकपणे भूमिका घेतो, हे सर्वांनाच माहित आहे. झालेही तसेच. काँग्रेसच्या एका मेळाव्यात पलूस कडेगावच्या वाघाने वरिष्ठ नेत्यांसमोरच पक्षाच्या कुचकामी धोरणाबाबत डरकाळी फोडली. ठोस राहण्याची भूमिका घ्यायला हवी ही दिशा दाखवली. हे सांगताना आपल्याला मिळालेला राजकीय वारसा याची आठवण करत भविष्यकाळात हिशोब चुकता करण्याची गर्जना या वाघाने केली. महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असताना राज्यात तुम्ही वाघ असाल पण सांगलीत आम्हीच वाघ असल्याचे ठासून या पलूस कडेगावच्या वाघाने सांगितले. नंतर सुरू झाली ती रणधुमाळी. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. प्रचाराला सुरुवात झाली. भाजपासह सर्वांनीच विशाल पाटील यांना उघड आणि छुपी मदत केली. निकाल हाती आला आणि राज्याला आश्चर्यचकित करणारा कौल मिळाला. अपक्ष असतानाही विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विशाल पाटील यांच्या या विजयाच्या रॅलीत सर्वच वाघ गुलालाच्या रंगात न्हाऊन गेले. जागेच्या वादात झालेली जखम त्या गुलालाने अखेर भरून निघाली.