पिंपरी विधानसभेसाठी भाजपाचे प्रबळ दावेदार ! कोण बाजी मारणार ?
- सीमा सावळे, अमित गोरखे, तेजस्विनी कदम उतरले मैदानात
- तिकिटासाठी नेत्यांच्या माध्यमातून पक्षाकडे लावली फिल्डींग
पिंपरी : आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी तिकीट मिळवण्यासाठी आपापल्या वरिष्ठांकडे फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. पिंपरी विधानसभेसाठी स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या प्रबळ दावेदार ठरत असल्या तरी अण्णा भाऊ साठे प्रदेश विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी देखील जोरदार शड्डू ठोकला आहे. आता निगडी प्राधिकरणातील उच्चशिक्षित असणा-या तेजस्विनी कदम यांनी पिंपरीच्या रणांगणात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून तिघांपैकी एकालाच तिकीट दिले जाणार आहे. तिकीट मिळवण्यात कोण बाजी मारणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पिंपरी विधानसभेसाठी भाजपातून एकसे बडकर एक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांचा या मतदार संघावर कायमच वरचष्मा राहिला आहे. विविध पदांवर काम करत असताना त्यांनी मतदार संघातील नागरिकांसोबत संपर्क कायम ठेवला. त्या तुल्यबळ ठरत असल्या तरी राज्याच्या अण्णा भाऊ साठे प्रदेश विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष असताना अमित गोरखे यांनी पिंपरीतील मतदारांचे प्रश्न समजून घेण्यावर भर दिला आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संपर्क वाढवला आहे. त्यामुळे तिकीटासाठी पक्षपातळीवरुन त्यांना नाकारले जाईल, असे सध्या तरी वाटत नाही.
हे दोन दावेदार असले तरी आता निगडीतील सुशिक्षित व्यक्तीमत्व असणा-या तेजस्विनी कदम यांचे नाव देखील चांगलेच चर्चेत आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव पदावर काम करताना कदम यांनी राज्यभर पक्षाची मोठ बांधण्याचे कार्य केले. चित्रपट महामंडळाच्या सदस्य असताना त्यांनी असंख्य कलाकार कामगारांचे प्रश्न सोडविले. शिवाय, त्या स्वतः संस्थापक अध्यक्ष असणा-या विरांगणा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघात दिनदुबळ्यांना कायमच मदतीचा हात दिला आहे. ज्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविले जात नाही, अशांना पक्षाच्या वरीष्ठ पातळीवरुन न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी पिंपरीवर दावा दाखल करुन तिकीटासाठी पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाकडे आग्रह धरणार आहे.