पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मटन विक्रीची दुकाने बंद ठेवा

पिंपरी (दि. १९) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात मटन, चिकन, मासे व मासळी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी महापालिका आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. शनिवारी (दि. २९) रोजी पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात तो शनिवारी मुक्कामी असणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुढे मार्गस्थ होईल. एक दिवस शहरात पालखी मुक्कामी असल्याने तीचे पावित्र्य जपले पाहिजे. शिवाय लाखो वारकरी, भक्त, भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात.

या कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाचे पावित्र्य राखण्यासाठी शहरातील मटण, चिकन, मासे, मासळी विक्री व खाद्यपदार्थाची दुकाने बंद ठेवणे अनिवार्य आहे. तसेच व्यवसायिकांनी देखील यास सहकार्य करणे गरजेचे आहे. ही पालखी शहराच्या बाहेर जाईपर्यंत दुकाने बंद न ठेवल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीकरांना आणि भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे, असे आदेश आपण प्रशासकीय यंत्रणेला द्यावेत, असे या पत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे.

                                                                                                  संतोष रमाकांत सौंदणकर
                                                                                                ९९७०००५०८९
Share to