गावकी-भावकीच्या भांडणावरून ग्रामस्थांचा ग्रामसभेत ‘राडा’

  • अवघ्या पाचच मिनिटात सभा तहकूब
  • कोयाळी गावातील ग्रामस्थांची परस्पर विरोधी तक्रार

पिंपरी | महाईन्यूज

गावच्या विकासाच्या मुद्यांवर सर्वांगीण चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली ग्रामसभा गावकी-भावकीच्या भांडणात उधळून लावली. पाठीमागील सभेतील चर्चेवर कुजबूज सुरू असताना एकमेकांचे हातपाय काढण्याची भाषा वापरण्यात आली. सभा सुरू करण्यास विलंब होत असल्याने सभा सुरू करा… सभा सुरू करा… म्हणत सभा सुरू होण्यापूर्वीच गोंधळ घातल्याने कोयाळी गावची ग्रामसभा अवघ्या पाच मिनिटात तहकूब करावी लागली. यावरून दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास कोयाळी येथील नाथ मंदीराजवळ घडली.

भरत नवनाथ आल्हाट (वय 36, रा. कोयाळी तर्फे चाकण रानमळा, कोयाळी, ता. खेळ, जि. पुणे) आणि गणेश दत्तात्रय कोळेकर (वय 26, रा. कोयाळी तर्फे चाकण बाबदेव वस्ती, ता. खेड, जि. पुणे) यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. याप्रकरणी एका तक्रारीतील बाळकृष्ण कोळेकर, आकाश बाळकृष्ण कोळेकर, अक्षय बाळकृष्ण कोळेकर, अप्पा लहानु दिघे, गोवर्धन गंगाराम टेंगले, गंगाराम देवराम टंगले (सर्व रा. कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड, जि. पुणे) आणि दुस-या तक्रारीतील भानुदास आल्हाट, भरत आल्हाट, राजाराम विठ्ठल आल्हाट, बापू बाळासाहेब सरोदे, देवदास अंकुश गायकवाड, महादेव सर्जेराव कोळेकर, शरद हरिभाऊ आल्हाट (सर्व रा. कोयाळी तर्फे चाकण, ता, खेड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी गावची गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास ग्रामसभा सुरू झाली. सरपंच गणेश कोळेकर, माजी सरपंच शरद आल्हाट, बापू तात्याभाऊ कोळेकर यांच्या मागील ग्रामसभेतील विषयावर भरत आल्हाट आपसात चर्चा करीत होते. त्यावर भरत यांनी काहीतरी विचारणा केली. तेव्हा बाळकृष्ण कोळेकर आणि आप्पा लहानु दिघे यांनी भानुदास आल्हाट यांना बोलावून घ्या. त्याचे हातपाय काढा, असा अपशब्द वापरला. त्यावर ग्रामसभेत एकच गोंधळ उडाल्याने ग्रामसभा अवघ्या पाचच मिनिटात तहकूब केली. त्यानंतर भरत आल्हाट बाहेर आल्यानंतर आकाश बाळकृष्ण कोळेकर त्यांच्याकडे धावून गेले. त्यांचा हात ओढून त्यांना मारहान केली. शिवीगाळ करून त्यांना दमदाटी केली. त्यावर बाळकृष्ण कोळेकर आणि गंगाराम देवराम टेंगले यांनी आल्हाट यांच्याशी पुन्हा शिविगाळ केली. त्यांच्या दुकानासमोरील वस्तुंची तोडफोड केली. आल्हाट यांना तु बाहेर ये तुला खल्लास करतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी बाळकृष्ण कोळेकर, आकाश बाळकृष्ण कोळेकर, अक्षय बाळकृष्ण कोळेकर, अप्पा लहानु दिघे, गोवर्धन गंगाराम टेंगले, गंगाराम देवराम टेंगले (सर्व रा. कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.   

तर, दुसरी घटना अशी की, कोयाळी गावातील नाथमंदीरात ग्रामसभा चालू झाली. सभेच्या सुरूवातीला जमलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी कोरमवरील उपस्थित लोकांच्या स्वाक्ष-या घेण्यात येत होत्या. त्यावेळी भानुदास आल्हाट, भरत आल्हाट, राजाराम विठ्ठल आल्हाट, बापू बाळासाहेब सरोदे, देवदास अंकुश गायकवाड, महादेव सर्जेराव कोळेकर, शरद हरिभाऊ आल्हाट (सर्व रा. कोयाळी तर्फे चाकण, ता, खेड, जि. पुणे) यांना सह्या घेण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सभेला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती गणेश कोळेकर यांनी दिली. त्यावेळी भानुदास आल्हाट यांनी मोठ्या आवाजात ‘सभा सुरू करा’ असे म्हणत सभेत गोंधळ घातला. त्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर गणेश कोळेकर मंदीराबाहेर आले असता त्यांना वरील सातजणांनी पाठीमागील ग्रामसभेतील भांडणाचा राग काढून धक्काबुक्की केली. शिविगाळ करून त्यांना दमदाटी करण्यात आली, असे कोळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share to